Wednesday 23 September, 2009

सावरकरांचा बुद्धीवाद




सर्व प्रकारची कर्मकांडे नाकारणाऱ्या, हिंदुत्वाशी नाते जोडणाऱ्या, हिंदुंपासून थेट मुसलमानांच्या अंधश्रद्धांवर कोणत्याही राजकीय भवितव्याची तमा न बाळगता, कठोर बुद्धीवादाच्या कसोटीतून मनुस्मृतीपासून बायबल-कुराणादी सर्व धर्मग्रंथांना कपाटात बंद करुन ठेवण्यास सांगणाऱ्या सावरकरांविषयी ‘सावरकरांचा बुद्धीवाद-एक चिकित्सक अभ्यास’ हा पाचशेच्यावर पृष्ठसंख्या असलेला ग्रंथ नांदेडच्या शेषराव मोरे यांनी लिहून नुकताच प्रसिद्ध केला आहे.
.

भूमिका
.

समाजसुधारकांविषयी लिहीताना बहुतेक विद्वान मंडळी म.फुले यांच्यापासून सुरुवात करुन कर्वे,आगरकर,म.गांधी असा प्रवास करीत डॉ.आंबेडकरांपर्यंत पोचतात. पुरोगामी, बुद्धीवादी विद्वानांच्या मालिकेविषयी साम्यवादी,समाजवादी आदी डाव्या विचारसरणीच्या गटांपासून सर्वजण आगरकर, आंबेडकर, मानवेंद्र रॉय, पं.नेहरु यांचीच नावे घेतात. पण या मालिकेत सर्वात महत्वाचे जे नाव यायला हवे त्या सावरकरांचे नाव मात्र नेमके वगळले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे सावरकरांच्या राजकीय विरोधकांना त्यांचा प्रखर हिंदुत्ववाद ‘सावरकर वादाचा ’ खरा अभ्यास करण्यापासून परावृत्त करतो.
.

ज्याप्रमाणे हे स्वयंघोषित बुद्धीवादी लेखक सावरकरांवर अन्याय करतात त्याप्रमाणे सावरकरांचे कट्टर भक्तही त्यांच्यावर अन्याय करतात. कारण लेखकाच्या मते काही अपवाद वगळता सावरकरांभोवती गोळा झालेला बहुसंख्य अनुयायी वर्ग दुर्दैवाने सनातनी व हिंदुधर्माचे स्वरुप काही मर्यादेतच बदलण्यास मान्यता देणारा असा समाज होता. त्यामुळे अनुयायी वर्गही स्वत:च्या कळतनकळत सावरकरांचे स्वरुप धर्माभिमानी दर्शवतात; असा काही अंशी मान्य होण्यासारखा आरोप प्रा.मोरे यांनी केला आहे.
अशा प्रकारे राष्ट्राला संजीवन ठरेल, एवढेच नव्हे तर जगात प्रगत अशा पहिल्या पाच राष्ट्रांच्या जोडीला भारतवर्ष नेऊन ठेऊ शकेल अशा योग्यतेचे विचार देणाऱ्या स्वा. सावरकरांचे हे बुद्धीप्रामाण्यवादी रुप झाकून ठेवणाऱ्या विरोधक व अनुयायी अशा दोघांचाही परामर्ष घेत पुरावे व परिस्थिती यांच्या सहाय्याने सावरकरांची अनेकांना न पेलणारी प्रतिमा या ग्रंथात उभी केली आहे. प्रत्येकाने अभ्यासावे असे हे पुस्तक आहे. याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येकास हे पुस्तक पूर्णपणे मान्य होईल. पुस्तकाचा अभ्यासही चिकीत्सक बुद्धी वादानेच व्हावयास हवा.प्रस्तुत ग्रंथ "प्रखर बुद्धीवाद" , "उपयुक्ततावाद", व "बुद्धीवाद विरोधी बाबी" अशा तीन भागात विभागला आहे.
.

सावरकरांची धर्मचिकित्सा
.

"खरा सनातन धर्म कोणता?" या लेखात सावरकरांनी धर्माचे विविध अर्थ सांगीतले आहेत.नैसगिक गुणधर्म (Characteristics ), तत्वज्ञान (Philosophy ), पारलौकिक सुखासाठी समाजनियम ( Religion ) व ऐहिक सुखासाठी समाजनियम अर्थात इंग्लिश मधे ‘लॉ’ Law या अर्थी धर्म , असे धर्म या शब्दाचे विविध अर्थ होत. यापैकी नैसर्गिक गुणधर्म या अर्थी असलेला धर्म हा सनातन म्हणजे शाश्वत आहे. उदा. अग्नीचा धर्म जाळणे. हिंदू, ख्रश्चन, ज्यु सर्वांनाच समानतेने लागू होतो. पण धर्माचे अन्य अर्थ सनातन (शाश्वत) या शब्दाला योग्य ठरतातच असे नाही, असे मत या लेखातून मांडल्याचे सांगून प्रा. मोरे म्हणतात की सावरकरांना अभिप्रेत असलेला धर्म, तो अनुष्याचे ऐहीक कर्तव्य या अर्थी आहे, तो कोणत्याही धर्मग्रंथात सापडणारा नाही. हा धर्म प्रत्यक्षनिष्ठ व्यवहाराचा धर्म आहे. त्याचे स्वरुप परिवर्तनीय म्हणजे बदलणारे आहे. यातूनच सावरकरांना ‘शब्दप्रामाण्य’, ‘बाबा वाक्यं प्रमाणम्‌’ मान्य नाही असे म्हणता येईल. धर्मग्रंथ हे सावरकरांना अपौरुषेय वाटत नाहीत. ‘आदरणीय पण अनुसरणीय नव्हेत’ हे धर्मग्रंथांविषयीचे मत त्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे मांडले होते. त्यामधे त्यांना कोणतीही तडजोड नको होती असे सांगून प्रा. मोरे त्या काळातील एका महत्वाच्या घटनेकडे वळतात. ती घटना म्हणजे आंबेडककृत मनुस्मृतीदहन !
.

मनुस्मृतीदहनासंबंधाने सावरकरांनी आंबेडकरांच्या कृत्याला नापसंती दाखवली ती त्यांच्या बुद्धीवादी भूमिकेस सुसंगतच होती. कारण सावरकरांची मनुस्मृती दहनासंबंधी नापसंती धार्मिक पातळीवर नव्हती. डॉ. आंबेडकर मनुस्मृती जाळत असताना सावरकर मनुस्मृतीतील विचारांचे प्रकट भाषणांतून कसे दहन करत होते ते लेखकाने सिद्ध केले आहे. मग सावरकरांचा विरोध कोणत्या पातळीवर होता? सावरकरांना आंबेडकरांचे हे कृत्य न संपणारे अपकृत्य वाटते. आक्रमकांनी शेकडो बौद्ध धर्मग्रंथ केवळ आपल्याला पसंत नाहीत म्हणून जाळले. म्हणून मनुस्मृती, बायबल, कुराण आदी कोणताच धर्मग्रंथ जाळू नये, तर तो केवळ इतिहास म्हणून अभ्यासण्यापुरता जतन करावा ही सावरकरांची भूमिका होती. सावरकरांची ही बुद्धीवादी भूमिका असा नि:ष्कर्ष ‘रीडल्स ’ प्रकरणाचा आढावा घेत या ग्रंथात काढला आहे. आंबेडकरांनी तेव्हा मनुस्कृती जाळली आज त्यांचे रिडल्स इन हिंदुइसम’ जाळले गेले. तेव्हा कोणाचेच काही जाळू नये, निव्वळ इतिहास ग्रंथ एवढ्यापुरतीच त्याची किंमत असावी हे सावरकरांचे मत बुद्धीवाद विरोधी नाही. सावरकर काय किंवा आंबेडकर काय दोघांचीही धर्मग्रंथांविषयी मूळ भूमिका समानच होती, फक्त त्यातील असमानतेच्या मतांविषयी संताप व्यक्त करण्याच्या पद्धतीत फरक होता, असे लेखकाचे मत आहे.
गोहत्या-गोपालन, यज्ञसंस्था, हिंदूंची अंतयात्रा पद्धत इ. बाबींचे साधन करुन सावरकर आपल्या तीक्ष्ण बुद्धीवादाने धर्मचिकीत्सा करीत जातात. धर्मचिकीत्सा सुरु केली की धर्म ही गोष्टच अस्तित्वात रहात नाही, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे मत मांडून ग्रंथात सावरकर धर्मचिकीत्सा करुन नेमके काय करत होते ते स्पष्ट केले आहे.
.

धर्म मानला की शब्दप्रामाण्य आलेच ! अनेकांची भूमिका असते की आमचा मूळ धर्म चांगला पण रुढींमुळे बिघडला आहे. धर्मसंस्थापक चुकू शकतच नाही असे त्यांचे मत असते. पण सावरकर मूळ धर्मप्रामाण्यही नाकारतात. धर्मग्रंथ किंवा धर्मसंस्थापक दोघांचेही शब्दप्रामाण्य नाकारतात मग धर्माच्या भाष्यकारांचा प्रश्नच उरत नाही. क्रांतीवीर सावरकर म्हटले की सर्वसामान्य माणसांना केवळ समुद्रात उडी मारणारे सावरकर आठवतात, त्याप्रमाणे बुद्धीवादी सावरकर म्हटले की विद्वानांना गायीला उपयुक्त पशू मानणारे एवढेच सावरकर वाटतात. पण गायीसारखी केवळ प्रतिकात्मक साधने घेऊन सावरकरांनी कठोर बुद्धीप्रामाण्य मांडले असून सावरकर हे चार्वाकाच्या परंपरेतील एक थोर बुद्धीवादी होते असा नि:ष्कर्ष प्रा. मोरे यांनी काढून हि वस्तुस्थिती बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत व हिंदुत्ववादी या दोघांनीही स्वीकारावी असे मत व्यक्त केले आहे.
.

उपयुक्ततावाद
.

मानवजातीच्या हितासाठी बुद्धीवाद म्हणजेच सावरकरांचा उपयुक्ततावाद !धर्म, धर्मग्रंथ यावर केलेल्या हल्ल्यांमुळे काही लोकांना वाटले की सावरकरांना धर्मातले चांगले तेही नको आहे. प्रत्यक्षात सावरकरांना चांगले ते हवेच होते. मूळ प्रश्न हा होता की त्यासाठी आधार कोणता असावा ! ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ या लेखात सावरकर म्हणतात, "सुदैवाने आपली शवदहनाची रुढी चांगली आहे. पण ती चांगली आहे म्हणून पाळली जात नसून त्यास पोथीचा आधार आहे म्हणून ती पाळली जात आहे." सावरकरांना सारे अद्यावत ( Up-to-Date ) हवे आहे पण त्याला पोथीनिष्ठतेचा आधार नको आहे. आजचे साम्यवादीही मार्क्सची "पोथी" प्रमाण मानू लागले आहेत. एकदा सावरकरांना विचारले गेले तुम्ही मार्क्स वाचला आहे का? सावरकरांनी तत्काळ प्रतिप्रश्न केला मार्क्सने सावरकर वाचला आहे का? भावार्थ एवढाच , कोणत्याही पोथीला प्रमाण न मानणारे सावरकर ‘मार्क्स वाक्यं प्रमाणम्‌ ’ असे मानणारच नाहीत. अर्थातच आपण मार्क्स पूर्णपणे वाचला आहे असे पुढील वाक्यातून स्पष्ट केले. बुद्धीचा आधार घेऊन केवळ व्यक्ती किंवा पोथी प्रामाण्य न मानणे हेच बुद्धीप्रामाण्य वादाचे महत्वाचे लक्षण असते.सावरकर मार्क्सवादावर फारसे बोलत नाहीत कारण तो राष्ट्रवादाविरुद्ध असतो. त्यांचा वर्गविग्रहाचा सिद्धांतही सावरकरांना मान्य नव्हता. ‘ राष्ट्रीय वर्गहितांचा समन्वय’ हे आर्थिक सूत्र हिंदूमहासभेचे अध्यक्ष म्हणून मांडले. कोणत्याही भारतीय नेत्याला या समन्वयापलिकडे जाता आलेले नाही हा सावरकरांच्या आर्थिक मतातीलही द्रष्टेपणा आहे असे मत या ग्रंथात व्यक्त झाले आहे.

.
उपयुक्तता हे नीतीमूल्य सावरकरांनी मांडले व त्याचा आधार बुद्धी हा मानला. नीतीचा असलेला धर्म, पापपुण्य हा आधार अमान्य केला. नीतीचा आधार पाप पुण्य असणे अयोग्य आहे कारण एका परिस्थितीत पुण्य ठरणारी बाब अन्य परिस्थितीत पाप ठरू शकते.अशावेळी सावरकर बुद्धीचा कौल मागतात. ‘ राष्ट्रहत्या की गोहत्या’ अशा पेचात धर्माने गोहत्या पाप मानले तरीही त्यास ते विशिष्ट परिस्थितीत पुण्य ठरवतात. त्यासाठी ‘पुष्कळांचे पुष्कळ हित’ हा उपयुक्तता वाद ते ग्राह्य ठरवतात.सावरकरांचा उपयुक्ततावाद हा असा आहे.गांधीजींच्या आत्यंतिक अहिंसेला सावरकरांचा असलेला विरोध याच भूमिकेतून आहे. काही परिस्थितीत हिंसा ही पुण्य आहे, पुण्य ठरू शकते ही गोष्ट गांधीजींना मान्य नाही. गांधीजी भगतसिंगाला किंवा क्रांतिकारक पक्षाला माथेफिरु ,मारो काटो का पंथ असे हिणवतात पण स्वामी श्रद्धानंदांची हत्या करणाऱ्याला मेरा भाई अब्दुल म्हणतात. हजारो हिंदुंची कत्तल करणारे मोपला गांधीजींचे ‘माय ब्रेव्ह मोपला ब्रदर्स’ असतात. प्रा. मोरे यांनी गांधीजींच्या या भूमिकेला विसंगत ठरवले आहे.सावरकरांना अर्थातच सर्ववेळी शस्त्र हेच उत्तार आहे असे कधीच वाटत नव्हते. काहिंचा समज असतो की सावरकर हे शस्त्रवेडे होते. सर्व प्रश्नांना शस्त्रवाद हेच उत्तर मानत होते. असे वाटण्याला अर्थातच काहीच आधार नाही. शस्त्रवाद ही एक उपयुक्तता, वस्तुस्तिती, अपरिहार्य अनिष्ट ते मानत. जेव्हा जेव्हा शस्त्र वापरणे टळेल तेव्हा ते टाळावे असेच त्यांचे मत होते. पण रक्तपाताला घाबरुन, हिंसा-अहिंसा अशा नीतीप्रश्नात अडकून किंवा धार्मिक पापपुण्याचा आधार घेऊन शस्त्रत्याग करुन बसणे म्हणजे राष्ट्राचा आणि राष्ट्रकार्याचा अटळ नाश असे त्यांचे मत होते.
.

हिंदुत्ववाद
.

सावरकर बुद्धीवादी असूनही हिंदुत्ववादी होते असी वर वर विसंगत वाटणारी वस्तुस्थिती होती. त्याचे कारण म्हणजे सावरकरांचे ‘हिंदुत्व’ हे धर्माहून भिन्न होते.हिंदूत्व म्हणजे विषिष्ट धर्मातील विशिष्ट तत्वांचा स्वीकार नव्हे तर हिंदुत्व हा शब्द ‘हिंदुपणा’ या अर्थी असून आपल्या हिंदूपणाचा ,स्वत्वाचा, पूर्वजांच्या इतिहासाचा अभिमान बाळगणे. दूसरे म्हणजे जो पर्यंत अन्य धर्मिय आअले हे स्वत्व सोडायला तयार नाहित तोपर्यंत हिंदूंनी आपले हिंदुत्व त्यागणे हा बुद्धीनिष्ठ सावरकरांना आत्मघात वाटत होता. या अर्थाने सावरकरांनी प्रखर हिंदुत्ववाद स्वीकारला जो पूर्णपणे बुद्धीनिष्ठ होता.
.

सावरकरांच्या काही भक्तांना सावरकर भगवान, अवतारी, आस्तिक, अद्वैताभिमानी वगैरे असल्याचे वाटते ते प्रा.मोर्व यांना मान्य नाही. सावरकर अद्वैत मानत पण ते आद्य शंकराचार्यांचे अद्वैत नसून जड-अद्वैत होते. सावरकर आत्मा हा ‘जड’ मानत. एकदा आत्मा ‘जड’ मानला की जड सृष्टिचा, पंचमहाभूतांचाच तो एक भाग ठरतो व सर्वत्र जडच असल्याने सावरकर जड-अद्वैतवादी ठरतात असे ग्रंथकाराचे म्हणणे आहे. हे मत बऱ्याच जणांना पटणारे नाही, या मताचा काळजीपूर्वक अभ्यास व्हावयास हवा.
.
सावरकर योगाभ्यासक होते, योगशास्त्राला सावरकर विज्ञानशास्त्र मानत असत तसेच त्यांना कुंडलिनी जागृतीचा प्रत्यय आला असल्याचेही त्यांनीच म्नमूद करुन ठेवले आहे, या साऱ्या गोष्टी प्रा.मोरे यांना मान्य आहेत. सावरकरांनी त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या हिंदुध्वजावर कृपाणाबरोबर ‘कुंडलिनी’ चे प्रतीक स्वीकारले होते.हिंदूंच्या योगशास्त्राचा त्यांना अभिमान वाटत होता ही सारी वस्तुस्थिती मान्य करूनही सावरकरांना स्वत:लाच राष्ट्रकार्यात गोगाची भौतिक शक्ती या दृष्टीने कवडीची पत असल्याचे वाटत नाही याची आठवण लेखक महोदय करुन देतात.
.

अशा प्रकारे सावरकरांच्या हिंदुत्ववादाचा अर्थ लावताना हिंदुधर्म, रूढी, धर्मतत्वे इत्यादी गोष्टींचा संबंध नसून त्याचा निव्वळ बुद्धीप्रामाण्य वादाशी संबंध असल्याचे प्रतिपादन या ग्रंथात केलेले आहे.
सावरकर हिंदुराष्ट्रवादातून धर्मतत्वे व अध्यात्म वगळून वैयक्तिक अभिनिवेशाने नवा बुद्धीवादी अर्थ ओतत होते हे पाहूनच गोळवलकर गुरुजींना सावरकर प्रणित हिंदूराष्ट्र नको होते असेही या ग्रंथाच्या मांडणीवरून दिसते.
.

अन्य धर्मिय ,धर्माच्या पायावर देशाची फाळणी करु पाहत आहेत त्यामुळे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या बहुसंख्यांकांनी- हिंदूंनी - संघटन करावे म्हणजे पाकिस्तानची मागणी आपोआप विरुन जाईल असा सावरकरांचा दृष्टीकोन होता. मुसलमान एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतील अशी भिती सावरकरांना वाटत होती ती पुढे खरी ठरली. हिंदूराष्ट्रवादातून त्यांनी शुद्धीकार्य सुरु केले. आंबेडकरांच्या धर्मांतराला त्यांनी विरोध केला तो त्याच भूमिकेतून. धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरते हे सूत्र मांडण्यामागे ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी होती. आंबेडकरांनी इस्लाम-ख्रिस्ती होणयापेक्षा बुद्धीवादी संघ स्थापन करावा असा त्यांचा आग्रह होता. बौद्ध धर्मांतरावर टिका करताना प्राचीन बौद्धधर्म त्यांच्या नजरेसमोर होता मात्र ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म ’ हा त्यांच्या ‘बुद्धीवादी संघ’ या कल्पनेशी मिळताजुळता असल्याने हा तर भीमयान अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. या सर्व भूमिकेत त्यांना हिंदू धर्मापेक्षा हिंदूत्वाची व हिंदू समाजाची चिंता होती हे स्पष्ट होते. म्हणूनच त्यांनी आपली ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या धर्मनिष्ठ न करता धर्ममुक्त केली. वैदीक, आर्यसमाजी, शीख, बौद्ध आदी सर्व हिंदूंना पितृभू व पुण्यभू या दोन घटकांद्वारे भारतभूमीशी नित्याकरता जोडून घेतले.
.

अन्य नेते हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी मुसलमानांना ते मागतील ते देत होते. ही लाचलुचपत राष्ट्रैक्याला हानिकारक ठरत आहे अशी सावरकरांची भावना होती. त्यामागील बुद्धीप्रामाण्यवादी भूमिका लक्षात न घेता त्यांचे विरोधक सावरकरांंना जातियवादी, धर्मांध अशी विशेषणे लावत होते. सावरकर ‘हिंदूराष्ट्र’ म्हणत असले तरी त्यात विशिष्ट धर्ममतांचा समावेश नव्हता हे कोणी ध्यानात घेतले नाही. त्यावेळीच्या अग्रणी नेत्याला हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी स्वतंत्र भारतात धर्मांध निजामाचे राज्य चालणार होते, भारताच्या सीमेवर घिरट्या घालणाऱ्या धर्मवेडया मुसलमान टोळ्यांचे राज्य चालणार होते पण हिंदुराष्ट्र या नावाने येणारे बुद्धिवादी, धर्मनिरपेक्ष असे सावरकर प्रणित राज्य नको होते; ही बुद्धिवादी सावरकरांची व देशाची शोकांतिका असल्याचे प्रस्तुत ग्रंथकाराने म्हटले आहे.
.

सध्याच्या परिस्थितीत मात्र नाव गांधीजींचे पण आचरण मात्र मंद गतीने का होईना सावरकर विचारांचे असा राष्ट्राचा प्रवास चालु आहे व सावरकरांना स्वीकारण्यावाचून राष्ट्राला पर्याय नाही. सावरकर समजाऊन घेणे म्हणजे त्यांचा कठोर बुद्धीवाद समजाऊन घेणे होय असे शेषराव मोरे यांचे प्रतिपादन आहे.
.
बुद्धिवाद हवा, बुद्धिवेड नको
.
“सावरकरांचा बुद्धीवाद" हा ग्रंथ प्रा. शेषराव मोरे यांनी कष्टपूर्वक, सखोल अभ्यास करुन लिहीला आहे.
पण निव्वळ बुद्धिवादाने काही सारे प्रश्न सुटत नाहीत. सावरकर कितीही मोठे बुद्धीवादी असले तरी त्यांच्या जाज्वल्य देशप्रेमाचे , देशावरील तीव्र निष्ठेचे कारण बुद्धीवादातून सापडणारे नाही कारण देशभक्ती ही सुद्धा एक श्रद्धाच नाही काय? सावरकर कोमल ह्रुदयाचे कवी होते. कठोर बुद्धीवादाने येणारी भावनाशून्यता त्यांच्या नव्हती. स्वत: सावरकरांनीही बुद्धीवादी व्हा, धर्मावेडे होऊ नका तसे बुद्धीवेडेही होऊ नका असे एका लेखात सांगितले आहे. ही वस्तुस्थिती दृष्टीआड न करता हे पुस्तक प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. आजचा तरुण मग तो अगदी विज्ञानशाखेचा विद्यार्थी असला तरीही बरेचदा अंधश्रद्ध असल्याचे आढळून येते. बुद्धीहत्या हि सर्वात मोठी हत्या आहे. तेव्हा या पुस्तकातील विचार संपूर्णपणे मान्य झाले नाहीत तरी सावरकरांच्या बुद्धीप्रामाण्यवादाचा सर्वांगीण विचार सुरु झाल्यास ते या पुस्तकाचे यशच ठरेल.
.

लेखन काल:- नोव्हेंबर १९८८

Thursday 27 August, 2009

इतिहासावर प्रकाशझोत ‘तेजोगोल’


एका इतिहासावर प्रकाशझोत

आचार्य बाळाराव सावरकर लिखित विविध राजकीय लेखांचा संग्रह ‘तेजोगोल’ या यथोचित शीर्षकासह वीर सावरकर प्रकाशन द्वारा प्रकाशित झाला आहे.

बाळाराव सावरकरांनी सोळा वर्षे स्वा.वीर सावरकरांचे निजीसचिव म्हणून निकटचा सहवास अनुभवला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सावरकरवादाचे ते अखंड चिंतन करीत आले आहेत. वीर सावरकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदीही बाळाराव सावरकरांची यावर्षीच निवड झाली आहे.
पुढील पिढयांतील इतिहासकारांना मार्गदर्शक ठरावे असे चार खंडांतील विस्तृत सावरकर चरित्र पूर्ण झाल्यावर सावरकर विचारांच्या चिंतनातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या विवडक लेखांचा संग्रह होणे आवश्यक होते. ती आवश्यकता ‘तेजोगोल’ च्या प्रकाशनामुळे काही अंशी पूर्ण झाली आहे.

विविध पैलूंवर प्रकाश

तेजोगोल मध्ये वीर सावरकरांच्या विचारांवर लेख आहेत त्याचप्रमाणे सत्ता, पैसा किंवा विविध दडपणे यांना शरण न जाता स्वा.सावरकरांशी निष्ठावंत राहणाऱ्या त्यांच्या अनुयायांवर बाळाराव सावरकरांनी लिहीलेले लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत.

वीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतिवाद, सुधारकी दृष्टीकोन ,विज्ञाननिष्ठा, हिंदुत्ववाद या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे लेख या संग्रहात आहेत.

या पुस्तकातील आमची आर्थिक नीती’ हा लेख वेगळ्या स्वरुपाचा आहे. स्वा.सावरकरांनी अर्थविषयक विचार दिला नाही किंवा हिंदुसभेला आर्थिक धोरण नव्हते वा नाही अशी टिका करणाऱ्यांना लेखकमहोदयांनी "वर्गहितांचा राष्ट्रिय समन्वय" या सूत्राचे विवरण करुन उत्तर दिले आहे.
‘तेजोगोल’ मधील ‘पत्रकार सावरकर’ ,रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ त्याचप्रमाणे ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ हे लेख विशेष उल्लेखनिय वाटतात.

निर्भिड पत्रकार

लोकमान्य टिळक, न.चि.केळकर, काका खाडिलक्लर इ. प्रभावी नेत्यांना पत्रकार म्हणून ओळखले जाते. सावरकर स्वत:ही एक निर्भिड पत्रकार कसे होते व हिंदुत्ववाद्यांची स्वत:ची वृत्तपत्रे (दैनिके) असावित यासाठी ते किती आग्रही होते व त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले याची माहिती पत्रकार सावरकर या लेखात आहे.

‘रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ या लेखातून सावरकरांची आंतरराष्ट्रीय राजकारणावर केवढी सूक्ष्म दृष्टी होती हे लक्षात येते. ‘गॉय अल्ड्रेड’ या ब्रिटिश पत्रकाराची भारतीय स्वातंत्र्याविषयीची तळमळ, फाळणीला विरोध तसेच त्यांनी गांधीवादाची केलेली परखड मिमांसा इत्यादी गोष्टींची अद्यापही काहिशी उपेक्षित असलेली माहिती ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ या लेखातून मिळते.बाबाराव सावरकर, डॉ. ना.भा. खरे, मसुरकर महाराज, मामाराव दाते यांच्यावरील लेखांतून त्या त्या व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे. देशभक्ती म्हणजे काही केवळ गांधीवाद नव्हे, ‘हिंदुसभा निवडणुका कशासाठी लढवते?’ या मुलाखतवजा लेखात ,वारंवार अपयश येऊनही हिंदुसभा राजकारणात का उभी आहे याची उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे.

सावरकर चरित्र

‘तेजोगोल’ मधील अंतिम लेख "वीर सावरकर चरित्र लेखन-अनुभव आणि उद्देश" हा असून बेळगाव येथे स्वा.सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे आचार्य बाळाराव सावरकरांचे अध्यक्षिय भाषण आहे.सावरकरांसारख्या तेजोगोलावर विस्तृत चरित्र लिहीताना त्यांना आलेले बरेवाईट अनुभव, काहिजणांचे सहय्य तर काहींचा विघ्नसंतोषीपणाचा इतिहास या भषणात मांडला आहे. सावरकर विचारांचे व सावरकर वाड्‌ंमयाचे आजही असलेले महत्व व त्याच्या प्रचारासाठी असलेले उपाय यात सांगितले आहेत. एकंदरीतच ‘तेजोगोल’ हा लेखसंग्रह सावरकरी विचारांशी ओळाख करून घेण्यास सर्व लहानथोरांस उपयुक्त ठरेल.


तेजोगोल: बाळाराव सावरकर
प्र. वीर सावरकर प्रकाशन,मुंबई
पृष्ठे २७२

प्रथम प्रकाशन:

२६ जून १९८८ दैनिक तरुण भारत

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

श्री. ह.मो.मराठे यांची "मार्केट" ही कादंबरी त्यांनी मालक-कामगार संबंधांवर तसेच औद्योगिक पार्श्वभूमीवर रेखाटली असून त्यातून समाजातील भ्रष्टाचार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणी
कादंबरीचे कथानक बडया कंपनीमधे मार्केटिंग ऑफीसर असलेल्या सुधाकर केळकर व त्यांच्या कुटुंबियांभोवती फिरत राहते.पैसा हीच निष्ठा असलेल्या केळकरांना अन्य तत्व असे काही नाहीच. उलट आपला कार्यभाग साधण्यासाठी आपल्या सहवासात येणार्या प्रत्येक माणसाला ते पैशाचे तत्वज्ञान सांगून भ्रष्टाचारी व भावनाहीन करुन टाकतात. त्यातून त्यांची पत्नी व मुलगीही सुटत नाही. एकप्रकारे केळकर हे पात्र म्हणजे समाजातील स्वार्थलोलूप भ्रष्टाचारी मंडळींचेच प्रतिक झाले आहे.

कथानक अगदी लहान आहे. कामगारांना बोनस म्हणून अर्धे पैसे रोखीने व उरलेले भेटवस्तूच्या स्वरुपात देण्याची योजना बी.वाय.पी. ही कंपनी आखते. पण भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या सुटकेसेस अतिशय हलक्या दर्जाच्या निघतात. या सुटकेसेस केळकरांच्या कंपनीने तयार केलेल्या असतात. या घटनेचा गवगवा होऊ नये म्हणून केळकर बी.वाय.पी. माणूस विकत घेऊन प्रकरण दाबून टाकतात. यात यश येताच प्रत्येक गोष्टीचे ,अगदी अर्काताच्या नात्यांचेही व्यापारीकरण करुन पैसा मिळवण्याच्या मागे केळकर ही व्यक्ती धावत सुटते.त्यांच्या खेळात त्यांची तरुण मुलगी बळी जाते. पण पैसानिष्ठ केळकर तिच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांशीही सौदा करतात.

इंग्रजी शब्दांची बजबजपुरी

कथानकाची मांडणी व सूत्र व्यवस्थित असले तरी कादंबरीची आंग्लाळलेली शाषा अयोग्य वाटते. कादंबरीत वातावरण निर्मितीसाठी व कृत्रिमता येऊ नये म्हणून इंग्रजी शब्द वापरण्याची आता रुढीच होत चालली आहे. पण तरिही कादंबरीत असलेली इंग्रजी शब्द व वाक्यांची बजबजपुरी अजिबात समर्थनीय नाही. कादंबरीच्या कथानकात हा मोठाच अडथळा होऊन बसला आहे.ऑफिसला कार्यालय, फोनला दूरध्वनी अशा प्रतिशब्दांची एकवेळ अपेक्षा नसली तरी- "‘ही टोल्ड की दि होल लॉट इज डिफेक्टिव्ह’- अशा स्वरुपाच्या वाक्यरचना अपेक्षित नव्हत्या. हे वाक्य अपवादात्मक नाही तर सर्व कादंबरीत अशीच भाषा मुक्तहस्ते वापरली गेली आहे. वातावरण निर्मितीसाठी (?) इंग्रजी शब्द वापरणारे लेखक महाशय मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात मोठमोठया पदांवर काम करणारे साठे ,पेंडसे ,जोग ,पुराणिक इ.नावांची मराठी माणसे दाखवतात. यात;आ बोल्डर ‘तोडकर’ नावाचा आहे. संपूर्ण कादंबरीत केवळ एक ‘आहुजा’ नावाचा असून तो केळकरांचाच बळी ठरलेला दाखवला आहे.आजची वस्तुस्थिती सर्वजण जाणतात. त्यामुळे ही विसंगती वाचकांना बोचल्याविना राहणार नाही.

समाजातून नष्ट होत जाणारी तत्वनिष्ठ माणसे किती दुबळ्या हातांची ठरत आहेत ते केळकरांच्या सासऱ्यांच्या व्यक्तीरेखेतून पुरेसे स्पष्ट केले गेले आहे. सामाजिक नीतीमूल्यांच्या ऱ्हासाबरोबरच ढासळती लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था यांचे चित्रणही लेखकाने यशस्वीपणे केले आहे. एकूण भाषाशुद्धता व तपशील यांचे दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे असे म्हणता येईल.

मार्केट: ह.मो.मराठे
प्र.मॅजेस्टिक प्रकाशन,गिरगाव,मुंबई-४
पृष्ठे २०९

प्रथम प्रकाशन:

दै. तरुण भारत ४ सप्टेंबर १९८८