एका इतिहासावर प्रकाशझोत आचार्य बाळाराव सावरकर लिखित विविध राजकीय लेखांचा संग्रह ‘तेजोगोल’ या यथोचित शीर्षकासह वीर सावरकर प्रकाशन द्वारा प्रकाशित झाला आहे. बाळाराव सावरकरांनी सोळा वर्षे स्वा.वीर सावरकरांचे निजीसचिव म्हणून निकटचा सहवास अनुभवला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सावरकरवादाचे ते अखंड चिंतन करीत आले आहेत. वीर सावरकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदीही बाळाराव सावरकरांची यावर्षीच निवड झाली आहे. पुढील पिढयांतील इतिहासकारांना मार्गदर्शक ठरावे असे चार खंडांतील विस्तृत सावरकर चरित्र पूर्ण झाल्यावर सावरकर विचारांच्या चिंतनातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या विवडक लेखांचा संग्रह होणे आवश्यक होते. ती आवश्यकता ‘तेजोगोल’ च्या प्रकाशनामुळे काही अंशी पूर्ण झाली आहे. विविध पैलूंवर प्रकाश तेजोगोल मध्ये वीर सावरकरांच्या विचारांवर लेख आहेत त्याचप्रमाणे सत्ता, पैसा किंवा विविध दडपणे यांना शरण न जाता स्वा.सावरकरांशी निष्ठावंत राहणाऱ्या त्यांच्या अनुयायांवर बाळाराव सावरकरांनी लिहीलेले लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत. वीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतिवाद, सुधारकी दृष्टीकोन ,विज्ञा...